*जाधववाडीच्या तीन बंधूंनी वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेस क्रीडा साहित्य वाटप करून राबविला अनोखा उपक्रम*
*जमदाडे बंधूं यांनी आपले वडील कै.सुरेश जमदाडे यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ समाजापुढे आदर्श निर्माण करून वाहिली अनोखी आदरांजली.*
फलटण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
दि ५ मे २०२६): येथील कै.सुरेश धोंडिबा जमदाडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियाकडून जाधववाडी(फ) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस खेळाचे साहित्य भेट देत अनोख्या उपक्रमाने प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्रीडा साहित्य शाळेचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांच्याकडे अजित सुरेश जमदाडे, सुजित सुरेश जमदाडे व शक्ति सुरेश जमदाडे या तिन्ही बंधूंनी सुपूर्त केले.
कै.सुरेश जमदाडे हे एक प्रामाणिक, वक्तशीर व शिस्तप्रिय बांधकाम व्यावसायिक म्हणून फलटण, माण, माळशिरस व बारामती तालुक्यामध्ये परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांचा हा मदतीचा वारसा व आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना डोळ्यापुढे ठेवून वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा मानस त्यांच्या तीनही मुलांनी त्यांच्या या कृतीतून दाखवून दिला आहे.
१ मे २०२६ रोजी शाळेचा निकाल असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रिकेट साहित्य, क्यूबज, फुटबॉल, बॅडमिंटन, साप-शिडी, बुद्धिबळ पट इ. साहित्य प्रशालेस भेट देण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना खेळातून आरोग्याचे महत्त्वही समजण्यास मदत होईल, असे मत कै. सुरेश जमदाडे यांचे थोरले चिरंजीव अजित जमदाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री नानासाहेब जमदाडे, महेश जमदाडे, माधव जमदाडे, हिम्मतराव जाधव तसेच अनेक मान्यवर मंडळी , पालक व जाधववाडी ग्रामस्थ उपस्थित होते.


























