सोनगाव बंगल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात आढळले मृतावस्थेत; मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. भाऊसो गणपत हजार (वय ४२, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसो हजार हे राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १२०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये सकाळी ९.१५ वाजता करण्यात आली आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबनावळ यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार खरात करीत आहेत.
या घटनेमुळे सोनगाव बंगला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























