मतदार यादी शुद्धीकरणासाठी फलटण नगरपरिषदेची वॉर्ड सभा; नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन
फलटण | प्रतिनिधी – समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी फलटण नगरपरिषदेतर्फे मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत बीएसएनएल कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वॉर्ड सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), मयत (Dead) तसेच दुबार (Duplicate) अशा ASDD मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांकडून मिळणारी माहिती व हरकतींची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.
मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागातील ASDD मतदारांची स्वतंत्र भागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या प्रक्रियेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने संबंधित प्रभागातील नागरिकांनी आपल्या वॉर्ड सभेला उपस्थित राहून योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (BLA) तसेच संबंधित घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. मतदार यादीतील चुकीच्या नोंदी, स्थलांतरित, मयत किंवा दुबार मतदारांची माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास मतदार यादी अधिक अचूक होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “अचूक व अद्ययावत मतदार यादी हा सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव योग्य प्रकारे मतदार यादीत असणे ही लोकशाही प्रक्रियेची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेला उपस्थित राहून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानास सहकार्य करावे.”
या उपक्रमामुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होऊन आगामी निवडणुकांसाठी अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक मतदार यादी तयार होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


























