आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी दिला निरोगी जीवनाचा संदेश
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.
फलटण, प्रतिनिधी : आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूल येथे आज दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह सन्माननीय रविंद्र बेडकिहाळ सर, शालेय समितीच्या चेअरमन अलकाताई बेडकिहाळ, प्रशासन अधिकारी भिवा जगताप सर, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण खरात सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
संस्थेचे कार्यवाह रविंद्र बेडकिहाळ सर यांनी योग ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.


























