फलटण पंचायत समितीच्या नव्याने स्थापन झालेल्या जाधववाडी गणातून सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव गायकवाड हे आगामी पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सध्या जोरदार उधाण आले आहे.
या जाधववाडी गणामध्ये जाधववाडी (फ), झिरपवाडी, दालवडी, विंचुर्णी, कुरवली खुर्द, जोरकुरवली खुर्द पुनर्वसन, तावडी, ठाकुरकी, गोळेगाव पुनर्वसन, सासकल, निरगुडी व मांडवखडक अशा बारा गावांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या, भौगोलिक व्याप्ती आणि सामाजिक रचनेमुळे हा गण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हिंदुराव गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी व बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. क्रांतिसूर्य कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३० हजारांहून अधिक शेतकरी, कष्टकरी व बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, जाधववाडी गणात त्यांच्या नावाची चर्चा जोमाने सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात हिंदुराव गायकवाड प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरतात का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


























