*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*!
*स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
**फलटण, प्रतिनिधी :** फलटण तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा आणि ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेताच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करावेत, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन दिले.
पेरणीनंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने तालुक्यातील अनेक गावांमधील पिके करपून गेली आहेत. काही ठिकाणी पिकांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, काही पिके वरून हिरवी दिसत असली, तरी जमिनीतील ओलावा संपल्याने आणि पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांमध्ये दाणे भरण्याची तसेच अपेक्षित उत्पादन देण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे केवळ काही गावांमध्ये पंचनामे करून अहवाल पाठविणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका संघटनेने मांडली.
शेतकऱ्यांच्या आठ प्रमुख मागण्या
संघटनेने निवेदनातून आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत. प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन सरसकट पंचनामे करावेत, तसेच जळालेल्या पिकांसोबत हिरवी दिसणारी; मात्र पाण्याअभावी नुकसान झालेली पिकेही पंचनाम्यात समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, शेतसारा, कृषिपंपांचे वीजबिल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील विद्यमान आमदार, खासदार व मंत्र्यांचे मासिक वेतन तसेच माजी आमदार व खासदारांचे पेन्शन बंद करून तो निधी शेतकरी कल्याण आणि दुष्काळ निवारणाच्या योजनांसाठी वापरावा, अशी भूमिका संघटनेने निवेदनात मांडली आहे.
याशिवाय, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी, सिंचन आणि जलसंधारणासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, तसेच मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यात आलेली पीकपाणी नोंद सातबारा उताऱ्यावर दिसत नसल्यास ती ४८ तासांत अद्ययावत करून सातबारा उताऱ्यावर दर्शवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. शासन आणि प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून पिकांचे सरसकट पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, शहराध्यक्ष विक्रम पवार, किसन शिंदे, बाबा कोकरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


























