सासवड, ता. २४ :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने प्रा. दिपाली पांडुरंग मालुसरे यांना मानव्य विद्याशाखेतील इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील इंग्रजी विभाग व संशोधन केंद्रामार्फत त्यांनी “नमिता गोखले व तह्मिमा अनम यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील संरचनात्मक हिंसाचार : एक तुलनात्मक अभ्यास” (A Comparative Study of Structural Violence in the Select Novels of Namita Gokhale and Tahmima Anam) या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता.
या संशोधनात भारत व बांगलादेशातील सरंजामशाही व्यवस्था, सामाजिक आत्मभान तसेच आर्थिक व सामाजिक स्तरांवर दडलेल्या सुप्त स्वरूपातील हिंसाचार व शोषण यांचे सूक्ष्म व सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संरचनांमधून निर्माण होणारा अन्याय, विषमता व दडपशाही यांचे साहित्यिक प्रतिबिंब या प्रबंधातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. स्त्री-अनुभव, सत्ता-संबंध आणि सामाजिक वास्तवाचा अभ्यास हे या संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरते.
या संशोधनासाठी वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय झगडे यांनी संशोधन मार्गदर्शन केले. वाघिरे महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी संशोधन केंद्रातून पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या संशोधक विद्यार्थिनी ठरल्या आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, पुणे विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य व मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, तसेच महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग, सहकारी व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


























