फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपालिका निवडणुकीचा तापमान दिवसेंदिवस वाढत असताना आज काँग्रेसने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग क्रमांक १३ साठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या समोर दाखल केला.
कार्यकर्त्यांचा जल्लोष, ढोल-ताशांच्या गजरात अर्ज दाखल
अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला.या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार, तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे काँग्रेसने निवडणूक रिंगणात मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसत होते.
फलटणच्या विकासाचा मुख्य अजेंडा
काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विकासाला प्राधान्य देत मजबूत भूमिका जाहीर केली आहे.
फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याच्या निर्धारातूनच सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
सामाजिक कार्यामुळे प्रभागात भक्कम जनाधार
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी समस्यांवर काम करणारे सचिन सूर्यवंशी यांनी प्रभागात मजबूत पकड निर्माण केली आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न लक्षवेधी ठरले आहेत.याच जनसंपर्क आणि कार्यपद्धतीच्या जोरावर त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचा उमेदवार मैदानात – निवडणूक चुरशीची
काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत या शक्तिप्रदर्शनातून मिळत आहेत.


























