“वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून संपूर्ण फलटण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषद प्रशासनाने तयारीला वेग दिला असून वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
फलटण नगर परिषदेच्या वतीने आज पालखी तळ परिसराची व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच पालखी तळावर उभारण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि आवश्यक कामांचा शुभारंभ फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक संदीप चोरमले, सोमाशेठ जाधव, आप्पा मांढरे, अनुप शहा, राहुल निंबाळकर, अमोल सस्ते, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नगर परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक रोहित नागतिळे, किरण राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा फलटणसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिकदृष्ट्या जिव्हाळ्याचा सोहळा आहे. लाखो वारकरी या मार्गावरून प्रवास करत असल्याने त्यांच्या निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी फलटण नगरपालिका संपूर्ण क्षमतेने काम करत असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासन, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे सेवा भावनेतून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनीही पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, नगर परिषदेचे सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असून स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुखकर वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यंदाचा पालखी सोहळा उत्साही, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आगमनाच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज होत असून नगर परिषदेच्या या तयारीमुळे वारकरी बांधवांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


























