कोळकी दि.३०| सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (ता. फलटण) आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ‘प्रज्ञा योग (Intuition Process)’ शिबिराचे आयोजन दिनांक २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे करण्यात आले.
या शिबिरात अहिल्यानगर येथील निवृत्त माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरेश बेदमुथा सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग व प्रज्ञा योग या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.
शिबिरामध्ये ८ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘उत्कर्ष योग’, तर १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘मेधा योग’ प्रशिक्षण देण्यात आले. एकाग्रता वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, अंतर्ज्ञान जागृत करणे तसेच तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करत आनंदाने राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी माजी प्राचार्य रविंद्र येवले, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य सौ. सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. आहिल्या कवितके, सौ. माधुरी माने, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच समारोपाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा श्री सुरेश बेदमुथा सरांनी विद्यार्थ्यांना खूप मौल्यवान बाबी या शिबिरामध्ये सांगितल्या. दैनंदिन जीवनात प्राणायाम, सकारात्मक दृष्टिकोन , आनंदी जीवन व प्रेमळ संवाद , आई वडील यांचा आदर करणे व योग्य आहार घेणे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी , स्मरणशक्ती , एकसंघता व आत्मशिस्त वाढीस लागल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अतिशय उत्साही वातावरणात ही तीन दिवसांची कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे छान पार पडली.


























