सातारा प्रतिनिधी —भटक्या-विमुक्त समाजाला ओबीसी प्रवर्गातून वगळून आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली १६ ऑक्टोबर रोजी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
माने यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदीनुसार आंध्र व तेलंगणा राज्यांतील मूळच्या ४२ भटक्या-विमुक्त जमातींचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात या जमातींना ओबीसी प्रवर्गात ठेवण्यात आले असून, तो ऐतिहासिक अन्याय दूर करण्याची गरज आहे.
“आम्ही गावकुसाबाहेर राहणारे, अस्थिर जीवन जगणारे लोक आहोत. आमचा शेती, उद्योग, बलुतेदारीशी काहीही संबंध नाही. तरी आमच्या नावावर इतरांनी लाभ घेतले आहेत. आम्हाला कोणाचे आरक्षण नको — फक्त आमचा योग्य हक्क म्हणजे आदिवासी दर्जा हवा,” असे माने म्हणाले.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वी भटक्या-विमुक्तांना ओबीसीतून वगळून स्वतंत्र ५.५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
“सरकारने निर्णय घेतला नाही, तर आम्ही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
भटक्या-विमुक्त संघटनेचे काम सध्या मुंबईसह राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.


























