सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान!
२,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; फलटणमध्ये ९५.८२ टक्के, तर कोरेगावमध्ये १०० टक्के मतदान
सातारा | दि. १ नोव्हेंबर २०२६
समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क फलटण
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी पार पडलेल्या मतदानात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जिल्ह्यातील एकूण २,०२१ मतदारांपैकी तब्बल १,९४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ९६.०९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार मतदानामध्ये १५६ महिला आणि १,७८६ पुरुष मतदारांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवरील आकडेवारीत कोरेगाव मतदारसंघाने १०० टक्के मतदानाची नोंद करत आघाडी घेतली.
मतदारसंघनिहाय मतदानाचा विचार करता कराडमध्ये ९७.९२ टक्के, पाटणमध्ये ९८.४९ टक्के, वाईमध्ये ९९.३० टक्के, खंडाळा येथे ९८.८६ टक्के, तर फलटणमध्ये ९५.८२ टक्के मतदान झाले.
फलटणमध्ये २५२ मतदारांनी बजावला हक्क
फलटण मतदारसंघात एकूण २६३ मतदारांपैकी २५२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ३४ महिला आणि २१८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. फलटणमध्येही ९५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, जावळी मतदारसंघात सर्वात कमी ८२.६१ टक्के मतदान झाले. सातारा येथे ९५.१४ टक्के, महाबळेश्वर येथे ९०.२० टक्के, खटाव येथे ९२.६७ टक्के आणि माण येथे ९५.९३ टक्के मतदानाची नोंद झाली.
निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९६.०९ टक्के मतदान झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध गटांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.






















