पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसात २५ टन कचऱ्याची विल्हेवाट; फलटण नगरपरिषदेची विक्रमी स्वच्छता मोहीम
फलटण, दि. २० जुलै : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर फलटण येथील विमानतळ मैदानावरील तब्बल २५ टनांहून अधिक कचऱ्याची अवघ्या एका दिवसात विल्हेवाट लावत फलटण नगरपरिषदेने विक्रमी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.
दरवर्षी पालखी सोहळ्यानंतर विमानतळ मैदान परिसरातील कचरा हटवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, यंदा पूर्वनियोजन, मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या योग्य वापरामुळे संपूर्ण परिसर अवघ्या एका दिवसात स्वच्छ करण्यात आला.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेत ही मोहीम पूर्ण केली. या उपक्रमात फलटणसह कराड, महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. विविध स्वयंसेवी संस्थांनीदेखील स्वच्छता मोहिमेत मोलाचे सहकार्य केले.
स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत संपूर्ण पालखीतळावर निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.
स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी या विक्रमी स्वच्छता मोहिमेची माहिती देताना सांगितले की, “पालखी सोहळ्यानंतर इतक्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही फलटण नगरपरिषदेची उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी आहे.”
यंदाच्या पालखी सोहळ्यानंतर राबविण्यात आलेली ही विक्रमी स्वच्छता मोहीम नागरिकांसाठी स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.


























