फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १२ लाख ८० हजार रुपयांचे ५७ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, दि. २६ सप्टेंबर २०२६ : फलटण ग्रामीण पोलिसांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ५७ हरवलेले मोबाईल फोन शोधून संबंधित मालकांना परत दिले आहेत. या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सातारा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी सीईआयआर पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित मोबाईल कोणत्या ठिकाणी वापरले जात आहेत याची माहिती मिळविण्यात आली. तपासादरम्यान अनेक मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वापरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबींची माहिती दिली. त्यानंतर काही मोबाईल कुरिअरद्वारे तर काही प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले. अनेक तक्रारदार दूर राहत असल्यामुळे त्यांचे मोबाईल कुरिअरद्वारे पाठवून देण्याची सोय देखील करण्यात आली.
सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ५७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असून त्यांची अंदाजे बाजार किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे. हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुर्वणवळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, सीईआयआर पोर्टल कर्मचारी श्रीनाथ कदम तसेच पोलीस अंमलदार नितीन चव्हाण, अमोल जगदाळे व हनुमंत दसरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी फलटण ग्रामीण पोलिसांचे आभार मानले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


























