📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा!
फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री करताना संबंधित विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. अनधिकृतरीत्या फटाक्यांची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारची अनधिकृत विक्री आढळल्यास नागरिकांनी तहसील कार्यालय, फलटण किंवा संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सुरक्षित दिवाळीसाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी!
दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. फटाके फोडताना लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसेच ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होईल, अशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी. फटाक्यांमुळे आग किंवा अन्य दुर्घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
फटाका विक्रेत्यांनी अधिकृत परवानग्या व लागू नियमांचे पालन करावे. नागरिकांनीही अनधिकृत फटाका विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
सुरक्षितता, पर्यावरणाचे संरक्षण आणि नियमांचे पालन यांना प्राधान्य देत सर्वांनी आनंदी, सुरक्षित व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन तहसील कार्यालय, फलटण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


























