फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर!
स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५ नोव्हेंबरपर्यंत पदयात्रा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अभयवचनाने प्रेरित होऊन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळा यंदा सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पालखी व रथाचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होणार असून, दि. २५ नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात रथ व पालखी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गजानन चौक, बुधवार पेठ, श्री स्वामी समर्थ मंदिर, शंकर मार्केट, श्रीराम मंदिर, गजानन चौक, उमाजी नाईक चौक व एस.टी. स्टँड मार्गे पालखी व रथ अक्कलकोटकडे मार्गस्थ होणार आहे. या शुभप्रसंगी फलटण शहरातील सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
१३ दिवसांचा भक्तिमय प्रवास; विविध गावांत भोजन व मुक्कामाची व्यवस्था
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट या पायी प्रवासाचे सविस्तर नियोजन करण्यात आले असून, सहभागी स्वामी भक्तांसाठी दररोज सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध गावांतील स्वामी भक्त, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पदयात्रेदरम्यान वाजेगाव, नातेपुते, साटपाकाटा, माळशिरस, तोंडले, पंढरपूर, सुरसे, शेजबाभळगाव, कामथी, बेलाटी, देगाव, कुमारी आणि कान्होळी आदी ठिकाणी नियोजनानुसार भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आगमन होणार असून, यावेळी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे दर्शनाचा कार्यक्रम नियोजित आहे. त्यानंतर बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी फलटणकडे परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान होणार आहे.
सेवाभाव, श्रद्धा आणि सामूहिक नामस्मरणाचा जागर
या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी, स्वामी भक्त आणि सेवाभावी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. संपूर्ण प्रवासादरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भोजन, पिण्याचे पाणी, निवास व अन्य आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी शिस्त, स्वच्छता व सेवाभाव जपत मंडळाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा जागर, सामूहिक नामस्मरण, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा संदेश देणारा हा पायी पालखी रथ सोहळा फलटणच्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरेत मानाचा ठरणार आहे.
‘क्षणोक्षणी वाटे स्वामी पदयात्रेचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार’ या भक्तिमय भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात फलटणसह परिसरातील जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
श्री. प्रथमेश चोरमले
श्री. आशीष नवारे
श्री. कृष्णा ढोबळे
आयोजक : श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण.


























