फलटण दि.३१|फलटण शहरातील मानाचे व प्रतिष्ठित असे शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षी मंडळाने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
या शिबिरात मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण १७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे ऋण फेडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. संकलित रक्त अक्षय रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले असून, याद्वारे हजारो गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्तपुरवठा होणार आहे.
शुक्रवार पेठ तालीम मंडळ दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांत आघाडीवर असते. गणपती उत्सवाबरोबरच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था, गणेश जयंती उत्सव, विविध रांगोळी व सांस्कृतिक स्पर्धा अशा उपक्रमांमुळे मंडळाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर बोलताना मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागत असल्याच्या भावनेतून हा उपक्रम राबवला. पुढील वर्षी व्यापक जनजागृती करून रक्तदात्यांची संख्या आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू.”
फलटण शहर व तालुक्यात या मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत असून, गणेशोत्सवाचा उत्साह आणि समाजसेवेची जाणीव यांचा संगम घडवून आणणारे हे मंडळ आज तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


























