वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
पुणे दि.१५|वारकरी संप्रदायासह धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ बहुमूल्य योगदान देणारे सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. अशोक महाराज पवार यांना अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांप्रदायिक तथा अध्यात्मिक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सासवड येथे अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांप्रदायिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ह. भ. प. अशोक महाराज पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.
या पुरस्काराचे वितरण पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, संजय निगडे, पिंटूशेठ जगदाळे, संदीप कटके, निखिल जगताप, राजेंद्र धुमाळ, रोहिदास कड, गोरख मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानामुळे वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून ह. भ. प. अशोक महाराज पवार यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


























