शास्त्रीय संगीत ही आपल्या भारताची संपूर्ण जगाला मोठी भेट आहे. परंतु नंतरच्या काळात योग्य प्रकाराने प्रचार आणि प्रसार न झाल्याने आपले पारंपरिक संगीत आणि नवी पिढी यामध्ये दरी निर्माण झाली आहे. असे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते.
ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटणच्या राजघराण्याने साहित्य, क्रीडा आणि कलांना पूर्वीपासूनच प्रोत्साहित केले आहे. फलटण परिसरात यामुळेच तुलनेने अधिक व्यासंगी, दर्दी रसिक आपणांस पाहावयास मिळतात.
शहर आणि परिसर शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहे. या बदलत्या काळात समाजाची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कारमूल्ये यांच्या जपणूकीचा विचार होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय संगीत पोहोचविण्यासाठी,त्याची गोडी वाढविण्यासाठी कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस यांनी पुढाकार घेऊन २०२० पासून ‘फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव’ या उपक्रमाची सुरुवात केली.यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्रागतिक विचारांच्या टीमचे तितकेच महत्वाचे मार्गर्शन आणि योगदान आहे.
हळूहळू हा महोत्सव फलटण शहराची सांस्कृतिक ओळख बनत आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने आतापर्यंत सावनी शेंडे, पोर्णिमा धुमाळे, प्रमोद मराठे, अमर ओक, श्रुती भावे अशा अत्यंत प्रतिभावान आणि प्रतिथयश कलाकारांचे आपल्या फलटण नगरीमध्ये सादरीकरण झाले आहे.
परंपरेतील संगीत नव्या पिढीसाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीने पेश केले जात आहे आणि रसिकांना ते भावते आहे. राग-तालांची अनुभूती फलटणकर रसिक अधिकाधिक संख्येने घेत आहेत.
यावर्षीचा महोत्सव दिनांक १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी सायं ६ ते ९ यावेळेत प्रतिवर्षाप्रमाणे मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित करण्यात येत आहे.
यावर्षीच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जादूची पेटी हा कार्यक्रम जगप्रसिद्ध कलाकार आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत.याचबरोबर आंतरराष्ट्रीय सनई वादक श्री.केदार जाधव हेही या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.
प्रतिभावान युवा कलाकार रसिका वैशंपायन, रियालिटी शोज मध्ये नाव कमावलेल्या प्रियांका चौधरी-ढेरंगे यांचे गायन आणि निवेदिता, नंदिता देशपांडे यांचे कथक नृत्य हेही या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस मुख्य प्रायोजक असलेल्या या महोत्सवाला जोशी हॉस्पिटल, अग्रोकेम फाउंडेशन, आय. आय. केअर फाउंडेशन, मॅग्नेशिया केमिकलस, अरिस्टा केमिकलस, अरिहंत ऑटोझोन, युनिटी डेव्हलपर्स आणि शांतीकाका सराफ अँड सन्स यांचे बहुमूल्य प्रायोजकत्व लाभले आहे.
कार्यक्रमाच्या “खुर्ची प्रवेशिका” जोशी हॉस्पिटल्स, अरिहंत ऑटोझोन (TVS Showrrom), शांतीकाका सराफ यांचे रिंग रोडवरील दालन आणि सरस्वती संगीत अकादमी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
या महोत्सवात सर्व कार्यक्रम वेळेत म्हणजे सायंकाळी ६ वाजता सुरु होतात याचीही रसिकांनी नोंद घ्यावी.
फलटणकर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत.
यावेळी भाग्यश्री गोसावी,प्राचार्य अरविंद निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी, उद्योजक प्रमोद निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंत शेडगे, संजीवन गोसावी,रामदास माने, भोसले सर,नंदिता मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.


























