पुणे भोर दि.२७| भेलके महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जाणीव निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विवेकपूर्ण आढावा घेण्याची प्रेरणा देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे संकलन नसून ते देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, असे सांगितले. त्यांनी सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संविधानिक मूल्ये जपण्याची जबाबदारी तरुणांवर अधिक असल्याचे अधोरेखित केले.यावेळी प्रा. सहदेव रोडे यांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क व कर्तव्ये यांचे संतुलन राखण्याची गरज स्पष्ट केली. तर प्रा. लांडगे संदीप यांनी आजच्या काळातील आव्हाने, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, नागरिकांची भूमिका यावर भाष्य करून विद्यार्थ्यांना सजग आणि जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थिनी दिव्या मालुसरे हिने संविधानामुळे मिळालेले समानतेचे अधिकार, शिक्षणाची संधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल मनोगत व्यक्त केले. तिने तरुण पिढीने संविधान समजून घेऊन त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात करणे किती आवश्यक आहे, हे प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रा. जाधवर दयानंद यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. रोहिदास ढाकणे प्रा. सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.भगवान गावित , प्रा जीवन गायकवाड, प्रा.संदीप लांडगे,प्रा. दयानंद जाधवर, प्रा. महेश कोळपे प्रा.माउली कोंडे, डॉ. गणपत आवटे, प्रा.भूषण समगीर, प्रा. अंकिता महांगरे, प्रा.वैष्णवी कोंडे , विकास ताकवले, शिवाजी सोनावणे, श्री. महेश दळवी, सीमा देशमुख उपस्थित होते. सुमित कांबळे आणि अभिषेक मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. कोंडे माऊली यांनी केला.


























