मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवात भर
प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2.0) नुसार बी.ए. भाग तीन, सत्र पाचच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे लेखन मुधोजी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले आहे.डॉ. एस. एम.भोसले, आटपाडी कॉलेज, आटपाडी व डॉ. सी आर. जाधव वारणा कॉलेज, वारणानगर हे सहलेखक आहेत.फडके प्रकाशन, कोल्हापूर यांच्या वतीने प्रकाशित झालेल्या या पुस्तकामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि ज्ञाननिर्मितीच्या परंपरेत मोलाची भर पडली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार जून २०२६ पासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक रचनेला अनुसरून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी तसेच परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
जागतिकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापार, विविध देशांमधील आर्थिक संबंध, परकीय चलन, जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडी यांचे महत्त्व वाढले आहे.या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रासारख्या महत्त्वपूर्ण विषयाचे अभ्यासपूर्ण लेखन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
प्राचार्यपदाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असताना अध्यापन, संशोधन आणि लेखनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणे ही कौतुकास्पद बाब आहे. डॉ. कदम यांनी केलेले हे पुस्तकलेखन त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार संदर्भसाहित्य उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे द्योतक आहे.मुधोजीमहाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव
मुधोजी महाविद्यालयाने फलटणच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या लेखनातून, संशोधनातून आणि ज्ञानदानातून ही परंपरा अधिक समृद्ध होत आहे. डॉ. कदम यांच्या पुस्तकामुळे या परंपरेत आणखी एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक कामगिरीची नोंद झाली आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीनेही ही बाब अभिमानास्पद आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला अनुरूप दर्जेदार पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मार्गदर्शन मिळते, तसेच शिक्षक आणि अभ्यासकांनाही संदर्भसाहित्याचा लाभ होतो.
या पुस्तकाच्या लेखनाबद्दल प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष-मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, ग. कौ.चे चेअरमन-मा.रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी- मा.श्रीमंत संजीवराजे नाईकनिंबाळकर,यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि सेवकवर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे मुधोजी महाविद्यालय आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नावलौकिकात भर पडली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

























