लाईफ लाईन रुग्णालयाविरोधात संताप; डॉ. जे. टी. पोळ यांच्या तातडीच्या उपचारांमुळे महिला वारकरीला जीवदान
फलटण | प्रतिनिधी – समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान नातेपुते येथे घसरून गंभीर जखमी झालेल्या एका महिला वारकरीला उपचारासाठी नेल्यानंतर खासगी रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली असून संबंधित रुग्णालय व डॉक्टरांविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, समाजसेवक सचिन गानबोटे यांच्या तत्परतेमुळे आणि डॉ. जे. टी. पोळ यांच्या तातडीच्या उपचारांमुळे संबंधित महिला वारकरीचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास समाजसेवक सचिन गानबोटे हे रिंगरोड परिसरातून जात असताना त्यांना एक रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसले. चौकशी केली असता, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या मागील दिंडी क्रमांक २ मधील उषा रमेश जठार (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा) या महिला वारकरी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजले. नातेपुते येथे घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
महिला वारकरीला तातडीने उपचार मिळावेत म्हणून रुग्णवाहिका फलटण येथे आणण्यात आली. रुग्णवाहिका चालकाने लाईफ लाईन रुग्णालयाचा पत्ता विचारल्यानंतर सचिन गानबोटे यांनी त्याला मार्ग दाखवला. मात्र काही वेळाने त्याच परिसरात तीच रुग्णवाहिका पुन्हा दिसल्याने त्यांनी चौकशी केली. त्यावेळी रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी सांगितले की, महिला वारकरीला लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करूनही तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. “इथे थांबू नका, बाहेर घेऊन जा,” असे सांगत रुग्णाला परत पाठविण्यात आल्याचा आरोप रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी केला.
ही माहिती मिळताच सचिन गानबोटे यांनी कोणताही विलंब न करता रुग्णवाहिका थेट जे. टी. हॉस्पिटलकडे वळवली. त्यांनी तातडीने डॉ. जे. टी. पोळ यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची गंभीर परिस्थिती सांगितली. रुग्णालयात पोहोचताच डॉ. पोळ यांनी महिला वारकरीची तपासणी करून डोक्याला गंभीर मार लागल्याचा संशय व्यक्त केला आणि तातडीने सीटी स्कॅन करण्याचे निर्देश दिले.
सीटी स्कॅन अहवालात मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिला वारकरीला जे. टी. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. वेळेत योग्य उपचार मिळाल्यामुळे संबंधित महिला वारकरीचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गंभीर अवस्थेतील वारकरीला उपचार नाकारल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, गंभीर जखमी महिला वारकरीला तातडीने मदत मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनीही फोन उचलला नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तत्परता दिसून आली नसल्याची नाराजी वारकरी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


























