पुणे दि.०७| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शंकरराव भेलके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’ चे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘भारतीय संविधान आणि सद्यस्थिती’ या विषयावर बोलताना प्रा. विशाल फलके यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य केले.
माणूस हा धर्मापेक्षा मोठा व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. विशाल फलके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची जी मुहूर्तमेढ रोवली, त्याला खऱ्या अर्थाने घटनात्मक रूप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आज आपण जे स्त्री स्वातंत्र्य अनुभवत आहोत किंवा हुंडाबंदी आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढत आहोत, ते केवळ संविधानामुळेच शक्य झाले आहे.”
लोकशाहीच्या स्तंभांवर भाष्य सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, “आज लोकशाही राजेशाहीकडे झुकत असल्याची भीती निर्माण झाली आहे. संविधानात मोडतोड करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून, मीडियाची भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे का? हा मोठा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे हिटलरच्या काळात खोट्या माहितीचा मारा करून समाज भरकटवला गेला, तसाच प्रकार आजच्या काळातही होताना दिसत आहे.”
संविधान वाचन काळाची गरज विद्यार्थ्यांना आवाहन करताना प्रा. फलके म्हणाले की, आदिवासी महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकली, हे संविधानाचेच यश आहे. मतदान आणि माहितीचा अधिकार ही संविधानाची मोठी फळे आहेत. मात्र, सध्या कायद्याचा दुरुपयोग वाढला असून, आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचे सखोल वाचन करणे ही काळाची गरज आहे.
“भारतीय संविधान हा केवळ एक ग्रंथ नसून ती आपली जीवनपद्धती आहे. आजच्या बदलत्या काळात संविधानातील मूल्ये केवळ वाचून चालणार नाहीत, तर ती प्रत्येकाने आपल्या आचरणात अंगीकारली पाहिजेत,” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप लांडगे यांनी केले. प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ.रोहिदास ढाकणे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.जाधवर दयानंद, प्रा. माऊली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.अंकिता महांगरे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकिता महांगरे व आभार प्रा.जीवन गायकवाड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.


























