‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल सिद्धाली शहा यांचा सत्कार
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
फलटण, प्रतिनिधी : ‘बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून ‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून नामांकन मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. सुंदरगिरी महाराज यांनी फलटण येथील कु. सिद्धाली शहा यांच्या निवासस्थानी स्वतः सदिच्छा भेट देत त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी कु. सिद्धाली शहा यांना पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी आशीर्वाद दिले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्री. सुंदरगिरी महाराज म्हणाले, “नगरसेवक अथवा नगरसेविका म्हणून जनतेचे काम करणे, हे खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा करण्यासारखेच आहे. आपल्या भागातील गोरगरीब आणि दुर्बल घटकांना नगरसेवक मदत करत असतात. जे नगरसेवक या दीनदुबळ्या व्यक्तींना आधार देतात, तेच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा करत असतात.”

पुढे बोलताना सुंदरगिरी महाराज यांनी लोकप्रतिनिधींच्या सामाजिक जबाबदारीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “कोणताही लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो, तेव्हा त्यामागे त्याच्या पूर्वजांची आणि आई-वडिलांची मोठी पुण्याई असते. कु. सिद्धाली अनुप शहा यांचे समाजातील कामकाज अतिशय आदर्शवत आहे. त्यांनी जागतिक स्तरावर मिळविलेला हा विक्रम आणि मानांकन हे त्यांनी केलेल्या मनुष्यरूपी ईश्वरसेवेचे उत्तम फळ आहे.”
यावेळी महाराजांनी कु. सिद्धाली शहा यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा वयातच लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवून जनसेवेला प्राधान्य देणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कारप्रसंगी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. सुंदरगिरी महाराज, फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा, युवा नेते संजय देशमुख, तसेच गजानन पेटकर, भारती पेटकर, भाग्यश्री जेबले, रूपाली साळुंखे, पद्मा चांडक, वर्षा कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, महेश पटवर्धन, अशोक सतुटे, पद्मा सतुटे आणि सुनीता सतुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


























