🌺 *स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
फलटण : सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद निंबाळकर तथा महेश शेठ गरवालिया यांच्या संकल्पनेतून आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणारे समाजसेवक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा यांच्या प्रयत्नांतून फलटण येथील माळजाई मंदिरात थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतुल शहा यांचे परममित्र संजय दुधाळ, रा.बारामती, यांनी आपला मुलगा स्वर्गीय श्रीराज संजय दुधाळ यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ पिण्याच्या पाण्याचा कुलर उपलब्ध करून दिला आहे.
आपल्या मुलाच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी समाजाच्या उपयोगी पडणारे कार्य करण्याचा संजय दुधाळ यांचा हा उपक्रम निश्चितच संवेदनशीलतेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा आहे. स्वर्गीय श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून देण्यात आलेला हा पाण्याचा कुलर अनेक नागरिकांची तहान भागविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
माळजाई मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी या परिसरात येतात, तर ज्येष्ठ नागरिकांचीही येथे नियमित वर्दळ असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पिण्याच्या पाण्याची आवश्यकता अधिक भासते. ही गरज लक्षात घेऊन अतुल शहा यांनी पुढाकार घेतला आणि संजय दुधाळ यांच्या सहकार्याने मंदिर परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
या सुविधेमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना उन्हाळ्यात तसेच वर्षभर आवश्यकतेनुसार थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांची गरज ओळखून केलेला हा उपक्रम समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
मुलाच्या स्मृतींना सामाजिक सेवेची जोड!
आपल्या मुलाच्या आठवणी केवळ मनात जपण्याऐवजी त्याच्या स्मरणार्थ समाजाच्या उपयोगी पडणारे कार्य करणे, ही भावना अत्यंत हृदयस्पर्शी आहे. स्वर्गीय श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांच्या आठवणी समाजाच्या सेवेशी जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून अनेक नागरिकांना दिलासा मिळणार असून, समाजोपयोगी कार्यातून स्मृती जपण्याचा एक सुंदर आदर्श निर्माण झाला आहे.
या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे अतुल शहा आणि आपल्या मुलाच्या स्मरणार्थ पाण्याचा कुलर उपलब्ध करून देणारे संजय दुधाळ यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सेवेच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या आठवणी कायमस्वरूपी प्रेरणा देतात. स्वर्गीय श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मृतींना अभिवादन करत, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला हा सेवाभावी उपक्रम अनेकांच्या उपयोगी पडो, हीच सदिच्छा! याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकर अरविंद भाई मेहता, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष रणजीत बर्गे, सेक्रेटरी प्रमोद भैय्या निंबाळकर, खजिनदार दिलीपराव शिंदे आय हॉस्पिटलचे अर्जुनराव घाडगे सेक्रेटरी चंद्रकांत कदम उद्योजक महेश शेठ गरवालिया लायन्स क्लब मसूरचे जगदीश पुरोहित उद्योजक मनुभाई पटेल तसेच बापूसाहेब जगताप, विजय पाटील, नीलम पाटील,सुहास निकम आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


























