फलटण दि.२९ –निसर्गातील प्रत्येक जीव हा अमूल्य आहे. त्याला जपणे, वाचवणे हे आपले कर्तव्य आहे याचे उत्तम उदाहरण फलटण एस.टी.स्टँडवर पाहायला मिळाले.
स्टँडलगतच्या आऊटगेटजवळील होर्डिंग्जवर एक पक्षी दोऱ्यात अडकून तडफडत होता. ही हृदयद्रावक घटना डॉ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या सदस्यांच्या नजरेस पडली. त्यांनी त्वरित ड्युटीवर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना याबाबत सांगितले.
क्षणाचाही विलंब न लावता जवान महादेव दडस आणि त्यांचे सहकारी खुशाल भंडलकर यांनी प्रसंगावधान दाखवत होर्डिंग्जवर चढून त्या पक्ष्याला दोरातून मुक्त केले. एवढेच नव्हे तर पक्ष्यास काही इजा झाली आहे का याचीही त्यांनी काळजीपूर्वक पाहणी केली. पक्षी सुखरूप असल्याची खात्री झाल्यावर त्याला पुन्हा आकाशात सोडण्यात आले.
या दोन जवानांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे एका निरपराध जीवाचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून मनापासून कौतुक होत असून, “मानवतेचे खरे रक्षणकर्ते हेच” अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


























