दहा वाजून पाच मिनिटांनीही लघुपाट बंधारे कार्यालयातील टेबल रिकामे; नागरिक त्रस्त
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : तालुक्यातील लघुपाट बंधारे कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ होऊनही तब्बल दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची टेबल रिकामीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.
शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध योजनांच्या कामासाठी आलेल्या नागरिकांनी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र संबंधित कर्मचारी वेळेत हजर नसल्याने कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“कार्यालयाची वेळ एक आणि कर्मचारी येण्याची वेळ दुसरीच,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. सरकारी कार्यालयांमध्ये वेळेचे कोणतेही बंधन राहिले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
लघुपाट बंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जातात. मात्र अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कार्यालयातील शिस्त सुधारावी व नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


























