विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा नाभिक महामंडळाकडून निषेध
आरोपीवर कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
फलटण, दि. ५: पुणे शहरातील विश्रांतवाडी येथे नाभिक समाजातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २२ सप्टेंबर रोजी झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी महामंडळाने फलटण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची ही घटना अत्यंत संतापजनक व मन हेलावून टाकणारी आहे. अशा घटनांमुळे समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, पीडितेला न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून आरोपीविरुद्ध POCSO कायद्यातील संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोरात कठोर कलमे लावून दोषारोपपत्र (चार्जशीट) शक्य तितक्या लवकर न्यायालयात दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच सदर प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक/विशेष न्यायालयात घेऊन प्रकरणाचा जलदगतीने निकाल लावावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. कल्याण देव, कार्याध्यक्ष मा. श्री. दामोदर विंचडे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. आंबादास तुकाराम ढकवे (सर) तसेच सरचिटणीस मा. श्री. पांडुरंग भवर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.


























