वडगाव निंबाळकर| दि.१७ | वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जबरदस्तीने दोन महिलांना नेत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची सुटका केली. या प्रकरणी दोन सराईतांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील स्विफ्ट कार (क्र. एमएच ११ एमडी ८०५५) जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी करंजेपूल बस स्टॉप परिसरात करण्यात आली. परिसरात गस्त घालत असताना लाल रंगाची काळ्या काचा असलेली गाडी संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून गाडी थांबवली असता, त्यामध्ये दोन पुरुषांसह दोन महिला आढळून आल्या. महिलांची चौकशी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पैशाचे आमिष दाखवून हडपसर (पुणे) येथून बेकायदेशीर पद्धतीने लोणंद येथे आणण्यात आले होते. आरोपी जबरदस्तीने त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. याआधीही अशाच प्रकारे लोणंद परिसरात आणून अवैध धंद्यास प्रवृत्त केल्याचे महिलांनी सांगितले.
या प्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) व प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या घटनेत आणखी मोठ्या रॅकेटचा मागोवा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्यासह पोलीस पथकातील इतर जवानांनी विशेष परिश्रम घेतले.


























