फलटण दि. २९ :फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.ची ७० वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने सभेला विशेष गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले.
सभेस महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारखान्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून सहकार चळवळ बळकट करण्याचे आवाहन केले. सभेला माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, तसेच कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.सभेत कारखान्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आगामी गळीत हंगामासाठी उत्पादनक्षमता वाढविणे, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे आणि कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी मान्यवरांनी सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले. सभासद व शेतकऱ्यांच्या विश्वासाने श्रीराम सहकारी साखर कारखाना सहकार क्षेत्रातील एक सक्षम संस्था म्हणून पुढे जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


























