सातारा, दि. १४ सप्टेंबर जिल्हा रुग्णालय सातारा येथे एकाच वेळी एका मातेने चार अपत्यांना जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली. साधारणपणे अशा प्रकारची घटना दहा लाख ते पाच कोटी प्रसूतींमध्ये एकदाच घडते, असे तज्ञ सांगतात.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक होताच तिला प्रसूती विभागात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान गर्भाशयात एकाच वेळी चार अपत्य असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने इमर्जन्सी सिझेरियन करण्यात आले.
ही जटिल शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदाशिव देसाई, डॉ. तुषार मसराम, भूलतज्ञ डॉ. निलम कदम, बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपाली राठोड-पाटील यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथकाने यशस्वीपणे पार पाडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अधिष्ठाता डॉ. विनायक काळे तसेच वरिष्ठ डॉक्टर डॉ. दासवाणी, डॉ. सचिन दगडे, डॉ. राहुलदेव खाडे, डॉ. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
या दुर्मिळ प्रसूतीनंतर माता व चारही अपत्ये सुखरूप असून रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे घडलेल्या या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


























