शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान; पांडुरंग बाजीराव पवार साहेबांचा ७५वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळ्याने साजरा होणार
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, दि. १९ : सरस्वती शिक्षण संस्थेचे तसेच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटणचे संस्थापक आदरणीय मा. श्री. पांडुरंग बाजीराव पवार साहेब यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देतानाच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी जपलेली बांधिलकी आणि समाजहिताची भूमिका यानिमित्ताने अधोरेखित होणार आहे.
पांडुरंग बाजीराव पवार साहेब यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यास प्रेरित होत आहेत.
शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हा अमृत महोत्सव सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कोळकी, ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास समाज प्रबोधन व्याख्याते तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. मा. श्री. नितीनजी बानगुडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, यावेळी त्यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. त्यांच्या विचारातून उपस्थितांना सामाजिक बांधिलकी, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रेरणा मिळणार आहे.
७५ वर्षांच्या जीवनप्रवासातील सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या अमृत महोत्सव सोहळ्यास नागरिक, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, हितचिंतक तसेच पवार परिवारावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


























