“श्वासात राजं, ध्यासात राजं”ने शिवजयंती उत्सवाची दिमाखदार सुरुवात; फलटणकरांनी अनुभवली स्वराज्यवीरांची थरारक गाथा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “श्वासात राजं, ध्यासात राजं” या भव्य कार्यक्रमाने शिवजयंती उत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. दि. १७ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करून शिवजन्मोउत्सवाला सुरवात झाली
स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या वीर मावळ्यांची शौर्यगाथा या कार्यक्रमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली. अंगावर शहारे आणणाऱ्या या सादरीकरणाचा अनुभव घेण्यासाठी शहरातील हजारो तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
गेल्या तब्बल २६ वर्षांपासून येथील शिवजयंती उत्सव समितीकडून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, यावर्षीचा “श्वासात राजं, ध्यासात राजं – स्वराज्य वीरांची अमर गाथा” हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.
हा कार्यक्रम वाइड विंग्ज मीडिया आणि कलाविश्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला. केवळ नाट्यप्रयोग नसून, स्वराज्यवीरांच्या शौर्य, भक्ती आणि बलिदानाची ही एक जिवंत गौरवगाथा आहे, जी संगीत, संवाद आणि प्रभावी अभिनयातून प्रेक्षकांसमोर उभी राहते.
कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले असून, गायन व संगीताची जबाबदारी अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी समर्थपणे सांभाळली. तसेच अजय पुरकर यांच्या प्रभावी आवाजातून आणि अभिनयातून इतिहास जिवंत झाल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला.
जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेली भूमिका विशेष ठरली.
शिवकालीन इतिहास, मावळ्यांचे बलिदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यांचे प्रेरणादायी दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप पाडली.


























