नसरापूर :२४ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिसाचे औचित्य साधून शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी परिसरातील प्लास्टिक, कागद, पिशव्या गोळा करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना डॉ. जगदीश शेवते यांनी “सेवा, शिस्त व समाजहित हीच खरी राष्ट्रीय सेवा योजनेची ओळख आहे” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून स्वच्छता, ऐक्य व पर्यावरणसंवर्धनात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. दयानंद जाधवर यांनी देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्याख्यान व चित्रफीतीच्या माध्यमातून करून दिली. तसेच ऐक्याचे महत्व समजावून सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना एकजुटीचा संदेश दिला. प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने उत्साहाने सहभाग घेतला.


























