सातारा (प्रतिनिधी) | सातारा जिल्हा ओबीसी महासंघाच्या वतीने आज (दि. ३ ऑक्टोबर २०२५) साताऱ्यात आक्रोश मेळावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मेळाव्यातील चर्चेनंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेले “कुणबी-मराठा, मराठा-कुणबी” दाखल्यासंदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दाखलेधारक मराठा-कुणबी यांना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठी तातडीने नवीन जीआर काढण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी संघटनेने स्पष्ट केले की मराठा समाजातील गोरगरीब बांधवांविषयी आमच्यात प्रेम व आदर असून त्यांना १९ टक्के स्वतंत्र आरक्षण दिले जावे, यास ओबीसी समाजाची पूर्ण मान्यता आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन जातीय सलोखा टिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ओबीसीसह सर्वच आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
हा मोर्चा शांततेत पार पडला. निवेदन पोपटराव गवळी (सातारा जिल्हा ओबीसी महासंघ) व अध्यक्ष भारत लोकरे (सातारा जिल्हा ओबीसी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.


























