फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिकांवर पुरवठा विभागाची धडक कारवाई:-
फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल
इराण इजराइल युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात गॅसचा पुरवठयावर मोठा परिणाम झाला आहे.यामुळे शासनाने इस्मा लागू केला आहे.घरगुती गॅस वापराला प्रथम प्राधान्य दिले आहे. तरी फलटण तालुक्यात अनेक हॉटेल व्यवसायिकांनी गॅसचा साठा केला होता. अशा तक्रारी आल्यानंतर फलटण नियंत्रण कक्षातून हॉटेल व्यवसायिकांवरती आणि हातगाड्यावरती नाश्त्याच्या, वडापाव, चायनीजचा व्यवसाय करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्र क्र. संकीर्ण-2026/प्र.क्र.35/नापु-27 दि. ८ मार्च २०२६ अन्वये सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंधन पुरवठा साखळीवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण तहसील व पुरवठा विभागातर्फे तालुक्यात भरारी तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.
या पथकाद्वारे हॉटेल आस्थापने, चहाचे स्टॉल आदी ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येत आहे. व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७नुसार कारवाई करण्यात येणार असल्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने आज दि. १६ मार्च २०२६ रोजी कोळकी व फलटण शहरात अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान एकूण १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.
सदर कारवाई तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पुरवठा निरीक्षक अश्विनी पोहरे, पुरवठा लिपीक अनिकेत केकाण, किरण चवरे तसेच शिपाई ओंकार गवारी यांचे सहकार्य लाभले.


























