फलटण | दि.२९ सातारा जिल्ह्यातील फलटणचा गड जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षातर्फे फलटण येथे दि.२८ नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित विराट जाहीर सभेत, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि सर्व शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सभेला संबोधित करताना शिंदे म्हणाले,
“ही सभा फक्त निवडणुकीसाठी नाही, तर फलटणला भीती–दहशतीच्या सावटातून मुक्त करण्यासाठी आलो आहोत.”
अनिकेतराजे हे उच्चशिक्षित असून समाजसेवेचा वारसा लाभलेले नेते असल्याचे सांगत, “लोकांनी साथ दिली तर स्वप्नातील आधुनिक, सुरक्षित आणि विकसनशील फलटण घडवू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
फलटण शहरातील एका तरुण डॉक्टर बहिणीवरील अन्यायाबद्दल न्याय मिळवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
तसेच “खोट्या आरोपांच्या दडपणाला बळी न पडता निर्भयपणे काम करा” असे निर्देश प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
विकासाच्या महत्त्वाच्या घोषणा सभेत फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी खालील आश्वासने देण्यात आली :
शहरातील रस्त्यांचे काम पूर्णत्वास
झोपडपट्टीवासियांचे एसआरए व गृहनिर्माण विभागामार्फत पुनर्वसन
फलटण एमआयडीसीचा विस्तार — उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी समन्वय
उपजिल्हा रुग्णालय ५० वरून १०० खाटांचे करण्यासाठी तत्काळ निर्देश
वाहतूक कोंडी निवारणासाठी चौक विस्तारीकरण
गडकोट किल्ल्यांची साफसफाई व संवर्धन
शहराच्या चारही बाजूंना ऐतिहासिक प्रवेशद्वार
बाणगंगा नदी घाट परिसरातील रस्त्यांची पुनर्बांधणी
हुडको वसाहतीतील नागरिकांना ९९ वर्षांचा फेरकरार
यावेळी कार्यक्रमास विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, तसेच हजारो नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























