खटाव :दि.०१ | दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली पिके पाण्यात बुडून नष्ट झाली असून, अनेक ठिकाणी शेतीची सुपीक माती वाहून गेल्याने आगामी हंगामाची भीषण चिंता निर्माण झाली आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई तीव्र झाली आहे.
या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. आधीच कर्जाच्या जोखडात अडकलेला शेतकरी आता जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खटाव तालुका रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसे न झाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे खटाव तालुका अध्यक्ष अर्जुनराव भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


























