केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचे धोरण स्वीकारले असून देशात ई-२० नंतर आता ई-२२ ते ई-३० पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी मानके अधिसूचित करण्यात आली आहेत. E30 म्हणजे पेट्रोलमध्ये ३० टक्के इथेनॉल मिश्रण असलेले इंधन होय. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने यासंदर्भातील मानके जाहीर केली आहेत.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
मात्र फलटण शहर व परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या वापराबाबत आवश्यक माहिती, वाहन सुसंगतता, काळजी घेण्याच्या सूचना तसेच इंधनातील इथेनॉलचे प्रमाण याबाबतचे फलक दिसून येत नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे.
वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलमध्ये आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने पाणी किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यास इंधनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः दीर्घकाळ वाहन न वापरल्यास किंवा इंधन साठवून ठेवल्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. जुन्या वाहनांच्या इंधन प्रणालीवर इथेनॉल मिश्रणाचा परिणाम होऊ शकतो, अशा चिंताही वाहनधारकांकडून व्यक्त होत आहेत.
फलटण येथील नाना पाटील परिसरातील पुणे-पंढरपूर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर अशा प्रकारच्या तक्रारींमुळे वाहनचालक आणि पंप चालक यांच्यात वाद झाल्याच्या घटनाही घडल्याचे सांगितले जाते. पेट्रोल खराब झाल्याने वाहने बंद पडणे, इंजिन सुरू न होणे तसेच दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याची नाराजी वाहनधारक व्यक्त करीत आहेत.
ग्राहक संघटनांच्या मते, पेट्रोल पंपांवर विक्री होणाऱ्या इंधनाचे स्वरूप, त्यातील इथेनॉलचे प्रमाण, कोणत्या वाहनांसाठी ते योग्य आहे याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे आवश्यक आहे. यासाठी दर्शनी भागात सूचना फलक लावणे, ग्राहक जनजागृती करणे आणि इंधनाची गुणवत्ता नियमित तपासणे गरजेचे आहे.
याबाबत संबंधित तेल कंपन्या व प्रशासनाने लक्ष घालून ग्राहकांना पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.


























