डॉ. आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले -प्रा.डॉ.प्रभाकर पवार
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
समतेचा आग्रह धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदे,हक्क व अधिकार याद्वारे दलित,पीडित,वंचित, उपेक्षित,आदिवासी, भटकेविमुक्त व गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समूहांना व तमाम स्त्रीवर्ग यांना भारतीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना नवा चेहरा प्राप्त करून दिला.असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी भिलकटी ता.फलटण येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उद्योजक राजकुमार कांबळे होते .
“जय भीम तरुण मंडळ”, भिलकटी,ता.फलटण यांनी आयोजित केलेल्या “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”,कार्यक्रमात प्रा.डॉ. प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.शांताराम काळे,पत्रकार मुकुटराव कदम व सुशांत घनवट होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना,प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी भारत देशावर आजन्म प्रेम केले, ते निष्ठावंत मातृभक्त व देशप्रेमी होते. त्यांनी हजारो वर्षे विविध प्रकारच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले. त्यांना निर्भीड करून हक्क व अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा दिली.पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांच्या गुलामीला पारावर उरला नव्हता.यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहून, स्त्रियांना शिक्षण,ज्ञान,मताचा अधिकार,पदाधिकार,वारसाहक्क,घटस्फोट व सन्मानाने जगण्याचा कायदेशीर संविधानात्मक अधिकार दिला, ज्यामुळे स्त्री सन्मानित होऊन तिला कौटुंबिक व सामाजिक स्तरावर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. डॉ.आंबेडकरांचे हे कार्य कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य लढयाएवढेच मोठे होते. मानवी स्वातंत्र्यासाठी व मानव मुक्तीसाठी लढणारा सर्वोत्तम योद्धा म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे.आज भारतीयांनी त्यांच्या विचारांचा अंगिकार करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.असेही, प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी आव्हान केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी डॉ.आंबेडकरांच्या “शिका संघटित व्हा व संघर्ष करा”,या उक्तीचा स्वीकार करून, तरुणांनी आपली प्रगती करून समाजविकासाला महत्त्व दिले पाहिजे,असे सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना राजकुमार कांबळे म्हणाले, भारतीय समाजाने डॉ. आंबेडकरांचे सामाजिक व आर्थिक विचारांचा अभ्यास करून व्यवसायनिष्ठ बनून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले. पाहिजे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शांताराम काळे यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ स्त्री-पुरुष, युवक-युवती उपस्थित होते.
शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


























