माण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, या भागात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने म्हसवड शहरात अक्षरशः पाणीच पाणी झाले आहे. बाजारपेठ, रस्ते, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
इतिहासात प्रथमच म्हसवड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची घटना घडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून शाळा, दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काही ठिकाणी दुकाने, घरांमध्ये पाणी घुसल्याने बचावासाठी लोकांना वरच्या मजल्यावर आसरा घ्यावा लागला.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “दुष्काळासाठी कुप्रसिद्ध असलेले म्हसवड आज पूरस्थितीचा सामना करत आहे. हे चित्र आम्ही प्रथमच पाहतोय.”
प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून पुढील काही तास अजून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.माण तालुक्याच्या इतिहासात ही एक अभूतपूर्व घटना मानली जात आहे.


























