सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज
१ नोव्हेंबरला मतदान; ३ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
सातारा, दि. २३ : सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी राहणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज दाखल : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६
– दाखल अर्जांची प्रसिद्धी : १ ऑक्टोबर २०२६
– उमेदवारी अर्जांची छाननी : ५ ऑक्टोबर २०२६
– वैध उमेदवारांची यादी : ६ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ वाजता
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ६ ते २१ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ ते दुपारी ३
– अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप : २१ ऑक्टोबर २०२६
– मतदान : १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८ ते सायंकाळी ५
– मतमोजणी व निकाल : ३ नोव्हेंबर २०२६
छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. २१ संचालक पदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकीय व सहकार क्षेत्रातील समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


























