सायबर फसवणुकीपासून सावध राहा; फलटण पोलिसांचे नागरिकांना आवाहन
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
OTP, PIN, पासवर्ड कोणालाही देऊ नका; संशयास्पद लिंकवर क्लिक टाळण्याचा सल्ला
फलटण, दि. २३ : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, यासाठी फलटण शहर पोलिसांच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

बँक, पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था दूरध्वनीवरून OTP, पासवर्ड किंवा ATM PIN मागत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस OTP किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. पैसे स्वीकारण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते. UPI PIN चा वापर केवळ पैसे पाठवताना केला जातो, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
KYC अपडेट, वीज बिल थकीत असल्याचे सांगणे, पार्सल अडकल्याचे कारण देणे अथवा बँक खाते बंद करण्याची धमकी देणे, अशा प्रकारचे संदेश किंवा फोन करून पाठविण्यात येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच पोलीस, CBI किंवा ED अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार होत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैसे देऊ नयेत. पोलीस अशा प्रकारे ऑनलाइन अटक करून पैशांची मागणी करत नाहीत.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे टाळावे. आपले फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता तसेच वैयक्तिक कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना ऑनलाइन पाठवू नयेत. ज्येष्ठ नागरिकांनी बँक खाते व ATM संदर्भातील माहिती गोपनीय ठेवावी. संशयास्पद फोन आल्यास तात्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन चॅटिंग करताना स्वतःची तसेच शाळेची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

तंत्रज्ञानाचा वापर बंद करण्याची गरज नसून, त्याचा वापर करताना अधिक जागरूक आणि सावध राहणे आवश्यक आहे. ‘थांबा—विचार करा, मगच क्लिक करा’, असा संदेश फलटण शहर पोलिसांकडून नागरिकांना देण्यात आला आहे.


























