*सोमंथळी गावासाठी तातडीने बस स्टॉप उभारावा; अन्यथा १५ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रशासनाला इशारा; फलटण तहसीलदारांना निवेदन
फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण–बारामती महामार्गावर असलेल्या सोमंथळी गावासाठी प्रवासी बस स्टॉप तातडीने बांधून द्यावा, तसेच बस थांब्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी बस स्टॉपचे काम सुरू करून त्याबाबत लेखी आश्वासन न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोमंथळी बस स्टॉपच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
फलटण–बारामती रोड हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग असून सोमंथळी गाव या मार्गावर वसलेले मोठे गाव आहे. गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी उन्हात व पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे. बस थांबण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सोमंथळी गावासाठी बस स्टॉप उभारण्याची जबाबदारी संबंधित हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत संबंधित हायवे कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला यापूर्वी लेखी तसेच तोंडी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
सोमंथळी गावाची लोकसंख्या मोठी असून दररोज ५०० हून अधिक प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षित आणि अधिकृत बस स्टॉप ही गावाची अत्यावश्यक गरज आहे. बस स्टॉपच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत बस स्टॉप बांधण्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास सोमंथळी ग्रामस्थांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बस स्टॉपच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
“आम्हाला आंदोलन करण्याची इच्छा नाही. मात्र, शासन आणि प्रशासनाने आमच्या न्याय्य मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बस स्टॉपचे काम सुरू करावे,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी धनंजय महामुलकर (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा), नितीन यादव (तालुकाध्यक्ष, फलटण), विक्रम पवार (शहराध्यक्ष, फलटण), डॉ. रवींद्र घाडगे (जिल्हा सरचिटणीस), प्रमोद गाडे (युवक राज्य प्रवक्ते), बाळासाहेब शिपुकले, बापूराव फरांदे, अशोक खलाटे, कांतीलाल अहिवळे, जगन्नाथ अहिवळे, अविनाश पोकळे, प्रल्हाद अहिवळे, आनंद आहिवळे यांच्यासह सोमंथळी ग्रामस्थ उपस्थित होते.


























