फलटण शहरात कर्कश सायलेन्सरच्या आवाजाचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास; पोलिस प्रशासन कारवाई करणार का?
फलटण, प्रतिनिधी : फलटण शहरातील विविध रस्त्यांवर सध्या काही दुचाकीस्वारांकडून मॉडिफाइड सायलेन्सर, कर्कश हॉर्न आणि मोठ्या आवाजात वाहन चालविण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा कर्कश आवाज काढत भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या तरुणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
या मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास वृद्ध नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अचानक होणाऱ्या फटाक्यासारख्या आवाजामुळे अनेकांना दचकायला होते. रात्री उशिरापर्यंत अशा प्रकारे वाहनांचा आवाज सुरू राहत असल्याने नागरिकांच्या शांततेवरही परिणाम होत आहे.
शहरातील काही ठिकाणी तरुणांकडून भरधाव वेगाने वाहने चालविणे, विनाकारण सायलेन्सरचा मोठा आवाज करणे, कर्कश हॉर्न वाजविणे, रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे असे प्रकार होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ ध्वनिप्रदूषणाचा नसून वाहतूक सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनला आहे.
पोलिस प्रशासनाची भूमिका काय?
फलटण शहरात अशा वाहनांची तपासणी करून मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई, कर्कश हॉर्नवर नियंत्रण आणि भरधाव वाहन चालविणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच रात्री अशा प्रकारांचा अधिक त्रास होत असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“कायदा सर्वांसाठी समान आहे. मग नागरिकांच्या शांततेचा भंग करणाऱ्या आणि रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” असा सवाल फलटणकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
फलटण शहरातील रोडरोमिओगिरी, कर्कश सायलेन्सर आणि फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या वाहनांवर पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


























