५०० रुपये दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय फलटण तालुक्यातील चारही साखर कारखाने सुरू करू देणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना अंतिम इशारा; ऊस वाहतूक व साखर उचल बंद करून गेटवर ठिय्या
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या ऊसाला अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नसल्याने प्रति टन ५०० रुपये दुसरा हप्ता कारखाना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अन्यथा तालुक्यातील चारही साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा अंतिम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिला आहे.
या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले. श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण; स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, उपळवे; शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, कापशी आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कारखान्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ ३२०० रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. गेल्या वर्षी कारखान्यांनी २०० रुपये अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते. मात्र, साखरेचे दर वाढलेले असताना कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर साखर शिल्लक आहे. त्यामुळे साखरेच्या वाढीव दराचा विचार करता आणखी ३०० रुपये वाढ देणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे २०० रुपये पूर्वीचे आणि ३०० रुपये अतिरिक्त, असे एकूण ५०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना धनंजय महामुलकर म्हणाले, “मा. राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानेच आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत. साखरेचे भाव वाढले, कारखानदारांनी कोट्यवधी रुपये कमावले; मात्र शेतकरी वाऱ्यावर आहे. कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही.”
यापुढे ऊस वाहतूक बंद, साखर उचल बंद तसेच कारखान्यांच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखानदार व प्रशासनाची राहील, असेही महामुलकर यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनावेळी युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, डॉ. रवींद्र घाडगे, किरण भोसले, विक्रम पवार, बाळासाहेब शिपुकले, अजित लाळगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन स्वीकारणारे अधिकारी : श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निवेदन चंद्रकांत तळेकर यांनी स्वीकारले. स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे निवेदन शेतकी अधिकारी प्रदीप मोहिते यांनी स्वीकारले. शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे निवेदन पाटील यांनी स्वीकारले, तर श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडीचे निवेदन अजित जगताप यांनी स्वीकारले.


























