शिवम वडार ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री २०२५–२६’चा मानकरी
पुणे दि.१४| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित आंतर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत वाघिरे महाविद्यालय, सासवडचा शिवम वडार याने ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री २०२५–२६’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले. ही भव्य स्पर्धा १० डिसेंबर रोजी सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
एकूण आठ वजनी गटांत झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत ७५ किलो वजन गटात शिवम वडार याने नगर विभाग, नाशिक विभाग व पुणे शहर विभागातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. त्याचप्रमाणे ६५ किलो वजन गटात पांडुरंग भोसले याने निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले.
सर्व वजनी गटांतील सुवर्णपदक विजेत्यांमधून सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटूची निवड करण्यात आली आणि आपल्या दिमाखदार शरीरयष्टी, ताकदवान पोझेस व सादरीकरणातील आत्मविश्वासाच्या जोरावर शिवम वडार याने ‘विद्यापीठ श्री’ किताब मिळवला. त्याच्या प्रत्येक पोझला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट मिळाला, तर परीक्षकांनीही त्याच्या मेहनतीची मनापासून प्रशंसा केली. विद्यापीठाचा ‘बेस्ट पोजर’ किताब पांडुरंग भोसले याने पटकावला.
या घवघवीत यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, क्रीडा अधिकारी श्याम भोसले तसेच प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशामागे प्रशिक्षक विशाल देवकर आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पहाटे गाड्या धुण्यापासून ‘विद्यापीठ श्री’पर्यंतचा संघर्षमय प्रवास
कोलवडी ह्या गावात राहणारा शिवम वडार हा केवळ विजेता खेळाडू नाही, तर संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. तो दररोज पहाटे तीन वाजता उठून सोसायटीतील गाड्या धुण्याचे काम करतो. सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर तो उर्वरित दिवस कठोर सराव व आहार नियोजनात घालवतो. मागासवर्गीय वडार समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या शिवमने या अतिशय खर्चिक खेळात आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
मात्र, इतके यश मिळवूनही हा गुणी खेळाडू आजही आर्थिक सहाय्यापासून वंचित आहे. त्याचा हा संघर्ष आणि यशकथा केवळ क्रीडाक्षेत्रालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारी आहे.


























